शुक्रवार, २५ जुलै, २०२५

आता कॉम्पुटर प्लॅनेट नवीन अपडेट्स गडजेट्स , कॅमेरा , प्रोडक्ट संदर्भात माहीती साठी whatsapp वर वर देखील उपलब्ध आहे.computer planet 1.1चा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा https://chat.whatsapp.com/KJgcoykoRCOLOA9vw4hDyi🕵‍♂For more exciting products, Download the Telegram app and join our Channel catalogue for product list of Cctv , spy , hidden cameras and fancy electronic, gifting products with specifications and prices. Link below 👇🏻👇🏻👇🏻https://t.me/spy_planethttps://linktr.ee/Satful

ही गोष्ट आहे लॉरेन्स लेम्यू नावाच्या एका खेळाडूची. तो कॅनडाचा एक नाविक (sailor) होता आणि त्याचं एकच स्वप्न होतं - ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणं. वर्षानुवर्षांच्या मेहनतीनंतर अखेर तो दिवस उजाडला. 24 September 1988 या दिवशी दक्षिण कोरियामधील सोल ऑलिम्पिकमध्ये तो शर्यतीसाठी समुद्रात उतरला होता.

शर्यत सुरू झाली. हवामान छान होतं आणि लॉरेन्सची बोट वेगाने पुढे जात होती. पण शर्यत सुरु असताना अचानक वाऱ्याचा वेग वाढला आणि समुद्रही खवळू लागला. बोट पुढे हाकणे कठीण होऊ लागले होते. मात्र लॉरेन्सला याची चिंता नव्हती. त्याचे बोटीवरील नियंत्रण उत्तम होते. बघता बघता तो शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. ऑलिम्पिक पदक आता अगदी दृष्टिपथात होतं. आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण होणार, या विचाराने तो रोमांचित झाला होता.

पण तेवढ्यात त्याला काहीतरी वेगळंच दिसलं.
थोड्याच अंतरावर, समुद्राच्या खवळलेल्या लाटांमध्ये एक बोट उलटली होती. सिंगापूरचे दोन खेळाडू मदतीसाठी धडपडत होते. त्यांचे प्राण धोक्यात होते. त्यापैकी एकाला गंभीर दुखापत झाली होती. रक्तस्त्राव होत होता.
आता लॉरेन्ससमोर एक मोठा प्रश्न होता. एकीकडे होतं त्याचं आयुष्यभराचं स्वप्न - ऑलिम्पिक पदक. आणि दुसरीकडे होते दोन अनोळखी माणसांचे प्राण. त्याने काय करायला हवं होतं?
लॉरेन्सने एका क्षणाचाही विचार केला नाही.

*================*
*
आता कॉम्पुटर प्लॅनेट नवीन अपडेट्स  गडजेट्स , कॅमेरा , प्रोडक्ट संदर्भात माहीती साठी whatsapp वर वर देखील उपलब्ध आहे.
computer planet 1.1चा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा 
https://chat.whatsapp.com/KJgcoykoRCOLOA9vw4hDyi

🕵‍♂For more
 exciting products, Download the Telegram app and join our Channel catalogue for product list of Cctv , spy , hidden   cameras and fancy electronic, gifting  products with specifications and prices. Link below 👇🏻👇🏻👇🏻
https://t.me/spy_planet
https://linktr.ee/Satful

†**************†**********************

त्याने आपली शर्यत अर्धवट सोडली आणि आपली बोट त्या बुडणाऱ्या खेळाडूंच्या दिशेने वळवली. लाटा आणि वाऱ्याशी झुंज देत त्याने त्या दोघांनाही वाचवलं आणि आपल्या बोटीवर घेतलं. बचाव पथक येईपर्यंत तो त्यांच्यासोबत थांबला.
हे सगळं झाल्यावर तो पुन्हा शर्यतीत परतला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तो शर्यतीत २२व्या स्थानी आला. त्याच्या हातातून पदक निसटलं होतं. त्याचं स्वप्न भंगलं होतं.
पण खरी गोष्ट तर पुढे घडणार होती.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष स्वतः लॉरेन्सला भेटायला आले. त्यांनी लॉरेन्सच्या गळ्यात सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदक घातलं नाही, तर एक विशेष पदक घातलं. ते होतं 'पिअर डी कुबर्टिन पदक' - जे खिलाडूवृत्ती आणि मानवतेचं सर्वोच्च प्रतीक मानलं जातं.

ते म्हणाले, "तू पदक जिंकलं नाहीस, पण तू तुझ्या त्यागाने आणि धैर्याने ऑलिम्पिकच्या खऱ्या मूल्यांचं दर्शन घडवलं आहेस."
पदकं अनेक जण जिंकतात, पण मनं जिंकणारे लॉरेन्ससारखे खेळाडू विरळेच असतात. आपल्या आयुष्यातही असे क्षण येतात, जेव्हा आपल्याला आपलं ध्येय आणि माणुसकी यांपैकी एकाची निवड करावी लागते. पण .....
मित्रांनो, क्षणभर थांबून कल्पना करा की लॉरेन्सच्या जागी आपण आहोत. अशावेळी आपण काय केले असते. मला माहित आहे की आपल्या सर्वांचे उत्तर असेल की आपणही पदकापेक्षा जीव वाचवण्याला प्राधान्य देऊ ! पण मंडळी बोलणं वेगळं आणि प्रत्यक्षात करणं वेगळं ! जेव्हा माणूस घाईत असतो किंवा त्याच्यासमोर कुठेतरी पोहोचण्याचे उददीष्ट असते तेव्हा बहुतांश लोक मदत करण्यासाठी थांबत नाहीत. (आणि सध्या तर आपण २४  तास ,  १२  महिने घाईतच असतो!). मी हे केवळ मला वाटतंय म्हणून सांगत नाही. तर अनेक मानसशास्त्रीय प्रयोगांनी हे सिद्ध झालंय.

प्रिन्स्टन विद्यापीठातील 'गुड सॅमरिटन' (Good Samaritan) प्रयोग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका प्रसिद्ध मानसशास्त्रीय प्रयोगात, धर्मगुरू बनण्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले.
पहिला गट: या गटाला 'गरजूंना कशी मदत करावी' (The Good Samaritan) या विषयावर भाषण तयार करायला सांगितले. त्यांच्या डोक्यात पूर्णपणे मदतीचे आणि सहानुभूतीचे विचार होते.
दुसरा गट: या गटाला एका सामान्य व्यावसायिक विषयावर (उदा. नोकरीच्या संधी) बोलायला सांगितले. या विषयाचा मदतीशी काहीही संबंध नव्हता.

यानंतर, प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांना एक - एक करून भाषण देण्यासाठी दुसऱ्या इमारतीत जायला सांगितले गेले. इथे एक गंमत होती. या दोन्ही गटांतील काही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले की, 'तुम्हाला खूप वेळ आहे, आरामात जा.' तर काहींना, 'तुम्हाला उशीर झाला आहे, ताबडतोब पोहोचा!' असे सांगून घाई करायला लावली.
पण खरी परीक्षा त्यांच्या मार्गात होती. रस्त्यात, एक व्यक्ती (जो प्रयोगाचाच एक भाग होता) आजारी असल्याचे नाटक करून बसवली होती, जिला मदतीची खरोखर गरज होती.

आता निकालाची खरी गंमत पाहा.
असे वाटले होते की ज्यांच्या डोक्यात 'मदत कशी करावी' यावर विचार चालू होते, ते विद्यार्थी जास्त मदत करतील. पण तसे अजिबात झाले नाही! भाषणाचा विषय कोणताही असो, त्याचा मदतीवर काहीही परिणाम झाला नाही.
मदतीवर परिणाम झाला तो फक्त एकाच गोष्टीचा - ती म्हणजे वेळेची घाई.
ज्यांच्याकडे भरपूर वेळ होता, त्यांच्यापैकी ६३% विद्यार्थी त्या गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी थांबले.
पण ज्यांना उशीर झाला होता, त्यांच्यापैकी केवळ १०% विद्यार्थीच थांबले.
विचार करा, उरलेले ९०% विद्यार्थी, ज्यांच्यापैकी काही 'मदत कशी करावी' यावर भाषण द्यायला जात होते, ते त्या गरजू व्यक्तीकडे दुर्लक्ष करून, अक्षरशः त्याला ओलांडून पुढे निघून गेले. त्यांच्या डोक्यात मदतीचे उदात्त विचार होते, पण घाई आणि दबावामुळे त्यांची कृती मात्र वेगळीच घडली.

लॉरेन्स लेम्यूची गोष्ट आणि 'गुड सॅमरिटन' प्रयोग आपल्याला एकाच महत्त्वाच्या सत्याची जाणीव करून देतो. आयुष्याच्या शर्यतीत धावताना, ध्येयाच्या दिशेने वेगाने जात असताना, आपल्या आजूबाजूला मदतीसाठीचा एखादा आवाज अनेकदा आपल्याला ऐकू येतच नाही. आणि कधीकधी ऐकू आला तरी  घाई आणि दबावामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. लॉरेन्सचं मोठेपण यातच आहे की, ऑलिम्पिक पदकाच्या प्रचंड दबावाखाली असतानाही त्याने माणुसकीचा आवाज ऐकला. त्याने शर्यत हरूनही आयुष्य जिंकलं.

किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, 
किसी का दर्द मिल सके तो ले उधार, 
किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, 
जीना इसी का नाम है।

मंगळवार, १ जुलै, २०२५

“रिअ‍ॅक्ट” न करता “रिस्पॉन्ड” करायला शिकायचं .

 पूर्वी  मी ज्या कंपनीत काम करायचो  तिथे माझा एक मित्र होता विवेक नावाचा. त्याचे आणि माझे डिपार्टमेंट वेगळे होते. पण ऑफिस बाहेरच्या चहाच्या टपरीवर किंवा कॅंटीनमध्ये नेहमी भेटायचा त्यामुळे मैत्री झाली होती.

विवेक हा एक साधा, पण हुशार व्यक्ती होता. थोडासा अबोल , काटेकोरपणे वेळ पाळणारा, आणि कामात पूर्णपणे झोकून देणारा माणूस. एका प्रोजेक्टसाठी त्याने महिनाभर जीव तोडून मेहनत केली होती. शनिवार-रविवारही  काम करायचा. त्याने एवढं  काम केलं  होतं  की सगळ्यांना खात्री होती की, हा प्रोजेक्ट  मॅनेजमेंट समोर सादर करायला विवेकचीच निवड होईल. कारण त्याने सर्वाधिक कष्ट घेतले होते.

पण बैठकीच्या दिवशी, त्याचा सीनियर समीरने  प्रेझेन्टेशन केलं आणि सगळं  क्रेडिट स्वतःच्या नावावर केलं.

विवेक तिथे बसून फक्त पाहत राहिला.

एक शब्दही न बोलता, फक्त पाहत राहिला.  

त्या संध्याकाळी  नेहमीच्या वेळी चहा प्यायलाही आला नाही. फोन केला आणि बळेच बाहेर घेऊन गेलो .  त्याचं मन त्या कॉन्फरन्स रूममध्येच अडकलेलं. “मी एवढे कष्ट केले , आणि त्याने श्रेय लुटलं. असा चोर आणि कृतघ्न माणूस मी कधी पाहिलाच नाही.” विवेक रागारागात पुढचे पाच मिनिटे फक्त त्याच्या सिनिअरला शिव्या देत होता .

मला गॉडफादर मधल्या मायकेल कोर्लीओनचा डायलॉग आठवला  आणि मी बोलून गेलो “Never hate your enemies. It affects your judgment.”  

विवेक क्षणभर थबकला. मी त्याला म्हंटल माझ्यावर पण रागावणार नसशील तर तुला थेट सांगतो .“तू समीरवर रागावला आहेस , की स्वतःवरच ? तू रागावला आहेस कारण तू गप्प बसलास? तू रागावला आहेस कारण समीरने प्रेझेन्टेशन इतकं चांगलं केलं की त्यालाच क्रेडिट मिळालं ? तू replacable आहेस  आणि  तू याबद्दल काहीच करू शकत नाहीस म्हणून तुला राग येतोय !


राग म्हणजे काय?

राग म्हणजे फक्त ओरडणं, भांडणं किंवा शिव्या देणं नाही. कधी-कधी तो आत साठलेला, न बोलता आलेलं दुखावलेपण असतो, असहाय्य्यता  असते. हा राग तुमच्या निर्णयांवर परिणाम करतो . 

तुमच्या डोळ्यासमोर रागाचं चित्र कसं असतं ? लालबुंद चेहरा, थरथरणारी बोटं, काहीतरी फेकून देणं? पण खरा राग इतका नाट्यमय नसतो. तो शांत असतो. गप्प. आत साचलेला. बाहेर हसत बोलताना, आतमधून विचारांची आग पेटलेली असते. “तो मला असं बोलला … मी हे कधीही विसरणार नाही.”  

आणि या साठलेल्या रागाचं सर्वात मोठं नुकसान कुठे होतं?

तुमच्या निर्णयक्षमतेवर !

मायकेल कोर्लीओनचं वाक्य सांगतं, की जेव्हा तुम्ही कोणावर राग धरता, तेव्हा तो राग तुमच्या डोक्यावर बसतो—त्याच्या नव्हे.

“तुम्ही शत्रूला शिक्षा देत नाही, तुम्ही स्वतःला गोंधळात टाकता.”  

रागाच्या भरात प्रत्येक गोष्ट त्या चष्म्यातूनच दिसते. प्रत्येक सल्ला संशयास्पद वाटतो. प्रत्येक पर्यायात धोका जाणवतो. “तो पुन्हा फसवेल का?” “मी मवाळपणा दाखवला, तर लोक मला कमजोर समजतील का?” “मी त्याच्यासारखं वागलो, तर त्याचं नुकसान होईल का?”  

हे प्रश्न स्वाभाविक वाटतात. पण त्यामागे भीती असते. आणि राग हे त्या भीतीचं कवच असतं.  


राग तुमचा फोकस हरवतो.

कल्पना करा, तुम्ही एखादी मोठी डील साइन करणार आहात. पण समोर बसलेली व्यक्ती तीच आहे, जिने याआधी तुमच्यावर टीका केली होती. तुम्ही आतून तापलेले आहात, पण बाहेरून शांत दिसायचं आहे. मग काय होतं? तुमचं लक्ष डीलवर कमी आणि त्या व्यक्तीच्या प्रतिक्रियेवर जास्त केंद्रित होतं. तिने geniunly एखादी जरी शंका विचारली तरी मुद्दामहून मला त्रास देण्यासाठीच विचारत आहे असं वाटू लागतं .


मग रागाचं करायचं काय?

खरं आहे, आपण कितीही समजूतदार असलो, तरी काही गोष्टी मनाला खूप लागतात . कोणी आपल्या मागे बोललं, मित्राने श्रेय चोरलं, ऑफिसात तुमची आयडिया दुसऱ्याच्या नावावर गेली, किंवा अगदी छोटी गोष्ट—ट्रॅफिकमध्ये कोणी कट मारून गेलं. तरी राग अनावर होतो.  

यावर आपण काय करायचं?  

“रिअ‍ॅक्ट” न करता “रिस्पॉन्ड” करायला शिकायचं .

“त्याने बोललं, म्हणून मी बोललो” — ही आहे प्रतिक्रिया.

पण “त्याने बोललं… तरी मी थांबून काय बोलणार ते आधी ठरवतो” — हा आहे प्रतिसाद.

लगेच उत्तर देण्याऐवजी थोडा वेळ घ्या. दोन खोल श्वास घ्या. स्वतःला विचारा, “माझा खरा उद्देश काय आहे?” तुमचं उत्तर एकदम वेगळं असेल.  

एक मिनिट थांबायला शिका

हा साधा, पण जबरदस्त उपाय आहे.

पुढच्या वेळी कोणी तुमच्या राग येईल असं काही करेल, तेव्हा जरा थांबा. घड्याळात एक मिनिट पाहा. काहीच बोलू नका. ना प्रतिक्रिया, ना प्रतिसाद.

त्या एका मिनिटात तुमचे भावनिक तापमान काही अंशांनी खाली येईल. आणि बऱ्याचदा, तुमचं उत्तर आपोआप सौम्य होईल.  


रागाचं प्रेरणेत रूपांतर करा

रागाला संधी म्हणून पाहा.

“हा राग का येतोय? कोणती मूल्यं दुखावली गेली?”

उदाहरण: कोणी तुमचं काम चोरलं—म्हणजे तुम्हाला प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे.

कोणी तुमचा वेळ वाया घालवला—म्हणजे तुम्ही वेळेची किंमत जाणता.

मग रागाची दिशा बदला. त्या मूल्यांचं रक्षण करण्यासाठी काम करा.

राग सतत मनात ठेवून चालत नाही. पण त्यातून प्रेरणा घेऊन काहीतरी चांगलं घडवता येतं.  


तुमचं “मोठं ध्येय” लक्षात ठेवा

क्लायंट डील गमावली. तुमच्याशी  कुणी चुकीचं वागलं. कोणी अपशब्द वापरले.


पण प्रत्युत्तर देताना आठवा, “माझं खरं ध्येय काय आहे?”

दोन मिनिटांचा वादविवाद जिंकणं? की पाच वर्षांचं उद्दिष्ट शांतपणे गाठणं?

रागाचं उत्तर तात्काळ मिळतं. पण शांततेचं उत्तर पुढे नेते.


आता विचार करा—

तुम्ही राग धरलात, तरी पुढच्या वेळी तो माणूस तसाच वागेल का?

की तुम्ही तुमचं उत्तर बदललंत, तर पुढचा अनुभवच वेगळा असेल?

राग ही फक्त एक भावना आहे. ती टाळता येत नाही. पण त्याला कसं उत्तर द्यायचं, हे शिकता येतं.  

आपण बऱ्याचदा समजतो, की शांत राहणं म्हणजे कमजोरी. “तो काहीही बोलला, आणि मी गप्प राहिलो? लोक काय म्हणतील?”

पण खरं सांगायचं, तर शांत राहणं ही एक निवड आहे. एक न बोलता व्यक्त होणारी ताकद. जी ओरडण्यापेक्षा खोल आवाज निर्माण करते.

रागाला उत्तर न देणं म्हणजे हार मानणं नाही. तो म्हणजे, “मी तुझ्या वागण्यावर प्रतिक्रिया देणार नाही, कारण माझी ओळख माझ्या कृतीवरून ठरेल.”  

हे पटण्यासाठी एक उदाहरण देतो . महाराष्ट्रात दोन नेत्यांचे पक्ष त्यांच्याकडून काढून घेण्यात आले . एक नेता संधी मिळेल तेव्हा  प्रतारणा करणाऱ्यासंबंधी राग व्यक्त करत असतो . दुसरा नेता  प्रतारणा करणाऱ्या विरोधी एक वाक्यही रागाने बोलला नाही.


तुम्हाला असा एखादा प्रसंग आठवतो का, जिथे तुम्ही रागात निर्णय घेतला आणि नंतर पश्चात्ताप झाला?

किंवा उलट—तुम्ही संयम ठेवला आणि काही दिवसांनी कळलं, “मी रागात उत्तर दिलं असतं, तर सगळं बिघडलं असतं…”

आपण अशा क्षणांतून शिकतो. आणि हळूहळू हे लक्षात येतं—शांत राहिल्याने तुम्ही निर्णय घेता. रागाने वागलात, तर निर्णय तुमच्यासाठी घेतले जातात.  


मायकेल कोर्लीओनचं वाक्य नीट लक्षात ठेवा -

“Never hate your enemies. It affects your judgment.”

हा फक्त माफिया चित्रपटातला डायलॉग नाही. हे एक जीवनाचं तत्त्व आहे—जिथे संघर्ष आहे, तिथे रागाऐवजी विचारशील शांततेला स्थान द्यायचं.

कारण शेवटी, शत्रूने कितीही त्रास दिला  तरी , तुमची निर्णयक्षमता जर सुस्पष्ट राहिली, तर तुम्ही कधीच हरत नाही.  


पुढच्या वेळी…

कोणी अपमान करत असेल…

कोणी धमकी देत असेल…

कोणी फसवत असेल…

तेव्हा फक्त एक प्रश्न स्वतःला विचारा:

“मी त्याच्या वागण्याप्रमाणे वागणार, की माझ्या मूल्यांनुसार?”  

तुमचं उत्तर त्या क्षणी ठरेल. पण तुमचं वर्तन तुमचं भविष्य घडवेल.  


हे वाचताना तुम्हाला एखादा प्रसंग आठवला का?

आजच ठरवा—पुढच्या अशा प्रसंगात तुम्ही “रिअ‍ॅक्ट” करणार की “रिस्पॉन्ड” करणार?

शत्रूचं वागणं कधीच आपल्या हातात नसतं. पण त्याला दिलेला प्रतिसाद—तीच आपली खरी ताकद असते !