.
किती विलक्षण आहे ना, दोन लोकांचा एक दिवस सारखाच असतो. दोघे समान गोष्टी अनुभवतात, पण दोघांचीही अनुभूती अगदी वेगळी असू शकते. एकाला फक्त अडथळे दिसतात, तर दुसऱ्याला त्याच ठिकाणी संधी दिसतात. तेच जग, पण वेगवेगळा दृष्टिकोन.
श्रीकांत सोशल मीडियावर स्क्रोल करत होता आणि नकळत, सगळ्या गोष्टी कशा बिनसल्यात, याची यादीच त्याच्या मनाशी तयार होत होती. त्याचवेळी उशीर होत असलेला प्रोजेक्ट, उत्तर न मिळालेल्या ई-मेल, आणि ट्रॅफिक जॅम... सगळं जणू गिरवल्यासारखं एकच गोष्ट सांगत होतं , “बघा, सगळंच माझ्या दृष्टीने उलट होत आहे ! काहीही मनासारखं घडत नाहीये.”
आणि मग अचानक त्याला जाणवलं — मीच माझ्या चिडचिडीला आधार देण्यासाठी कारणं शोधत आहे.
कुठल्याशा एका पुस्तकात वाचलेली एक गोष्ट त्याला आठवली आणि त्याने त्याच क्षणी ठरवलं, त्या पुस्तकात सांगितलेला एक छोटासा प्रयोग करायचा. भोवतालच्या चांगल्या गोष्टी शोधून पाहायच्या. सकाळी लिफ्ट मध्ये जाताना एका अनोळखी व्यक्तीने दरवाजा उघडून धरला होता. कॅफेमध्ये गेलो तेव्हा तिथल्या मुलाने माझ्या ऑर्डरची आठवण ठेवून मला पाहिजे तशी कॉफी न सांगता बनवून आणली. एका क्लायंटने आवर्जून ईमेल करून काम आवडलं असल्याचं कळवलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जितक्या जास्त चांगल्या गोष्टी श्रीकांतने शोधल्या, तितक्या त्या वाढल्यासारख्या वाटल्या.
मित्रांनो, तुम्हीही हे करून पहा. तुम्हालाही हाच अनुभव येईल. आयुष्य म्हणजे एक भलामोठा बुफे आहे. त्यात आवडीचे पदार्थही आहेत आणि न आवडणारे देखील. कडवट क्षण किंवा गोड क्षण—आपण आपल्या ताटात काय वाढून घ्यायचं ते आपल्या हातात आहे. आपल्या सोबत काय घडतंय यावर काहीच अवलंबून नाही, तर आपण कशावर लक्ष केंद्रित करतोय यावर सर्व अवलंबून आहे.
तुम्ही कधी नोटीस केलंय का की जेव्हा जेव्हा आपला मूड खराब असतो तेव्हा तेव्हा अपॊआप आपल्यासोबत चुकीच्या गोष्टी घडायला लागतात? हातातील वस्तू कुठे ठेवली आठवत नाही, Wifi अचानक बंद होतो, मोबाईल हातातून सटकतो किंवा कॉफी सांडते...लक्षात घ्या या गोष्टी आपण tune केलेल्या असतात म्हणून आपल्यासोबत घडताना दिसतात.
कदाचित तुम्हाला हे काहीतरी मोटिव्हशनल ग्यान वाटेल पण हे खरंच आपल्या आयुष्याला बदलू शकेल एवढं पॉवरफुल आहे. जेव्हा आपण चांगल्या लोकांची अपेक्षा ठेवतो, तेव्हा आपण जास्त हसतो, मोकळेपणाने वागतो, संवाद साधतो… आणि काय होतं? लोक खरंच मदतीसाठी पुढे येतात. जेव्हा आपण संधी शोधतो, तेव्हा आपण त्या घेण्याचा धोका पत्करतो. आणि मग संधी खरंच समोर येतात.
आज रात्री झोपण्याआधी एक गोष्ट आवर्जून करा — मी स्वतःला कोणती गोष्ट सांगतोय याबद्दल अधिक जागरूक राहा. कारण तुम्ही जी पण स्टोरी स्वतःला सांगत आहात त्याचे पुरावे आसपास दिसायला लागतील ! म्हणूनच तीच स्टोरी स्वतःला सांगा जी जगायला तुम्हाला आवडेल !
धन्यवाद,
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा